आजकाल सर्वच विवाहित पुरुष आपल्या पत्नीला आनंदी कसं ठेवायचं याचा सतत विचार करत असतात. कारण आपले स्वतःचे वैवाहिक जीवन सुखाचं आणि समाधानाचं असावं असं प्रत्येक विवाहित पुरुषाला वाटत असते. अनेक विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात लग्न झाल्यावर भरभरून उतू जाणारे प्रेम हे काळाच्या ओघात नंतर कमी कमी होत जाते.
आपण हे ऐकलेच असेल कि, लग्न हे फक्त दोन व्यक्तींचं नात नसून दोन परिवारांच मिलन असतं. या नात्याची गाठ एकीकडे पतीकडे असते आणि दुसरी गाठ हि पत्नीकडे असते. तसं पाहिलं तर पती-पत्नीचं नात हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानले गेले आहे.
कधी कधी आपण पाहिलेच असेल कि कामाच्या गडबडीत, करिअर बनवण्याच्या नादात तुमचे तुमच्या पत्नीकडे दुर्लक्ष होते. मग यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो. आपल्या दैनंदिन जीवनात काही अगदी सोप्या टिप्सने तुम्ही बायकोला खुश ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या नात्यात निर्माण होत असलेला दुरावा दूर करण्यात निश्चितच तुम्हाला यश मिळेल.
चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने बायकोला खुश ठेवता येईल.
1. सन्मान
जेव्हा एखाद्या जोडप्याचे नवीन लग्न होते, तेव्हा ते एकमेकांचा खूपच सन्मान करत असतात. मात्र काळाच्या ओघात किंवा कामाचा व्याप वाढल्याने त्यांना एकमेकांचा सन्मान करणे जमत नाही. अशावेळी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. मात्र जर तुम्ही तुमच्या पत्नीचा योग्य सन्मान केला, किंवा जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीपुढे आपल्या पत्नीला आदराची वागणूक दिली तर निश्चितपणे तुमची पत्नी खुश झाल्याशिवाय राहणार नाही व ती देखील तुमची काळजी घेईल व तुमचा सन्मान करील.
2. घरकामात थोडी मदत करा
तुमची बायको घरातील सर्व काही कामे बिनबोभाट करत असते, त्याबद्दल ती कधीही तक्रार करत नाही. मग एखाद्या वेळेस जेव्हा ती जास्त दमलेली असेल त्यावेळी तुम्ही तिला घरकामात थोडी मदत करा. तुमच्या या कृतीने तुमची बायको निश्चितच खुश होईल व आपल्यालाही त्यामुळे काहीतरी काम केल्याचा आनंद मिळेल.
3. प्रशंसा करा
तुमच्या दैनंदिन कामकाजात तुम्ही बायकोचे कौतुक करणे विसरूनच जाता. जेव्हा बायको एखादा चांगला खाद्यपदार्थ बनवते, एखादी कलाकुसरीची वस्तू बनवते, घरदार चांगले आवरते किंवा एखाद्या दिवशी बायकोने खूपच चांगला मेकअप केला असेल तर चार शब्द चांगले बोलून तिची प्रशंसा करा.
तुमच्या या कृतीने बायकोच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नक्कीच तुमची बायको तुमच्यावर खुश होईल.
4. प्रामाणिकपणा दाखवा
नवरा बायकोचे नाते हे विश्वासावर अवलंबून असते. आपले वैवाहिक जीवन आनंदी व्हावे असे वाटत असेल तर बायकोबरोबर प्रामाणिकपणा दाखवा. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना संकोच न बाळगता तुमच्या बायकोला सांगा. यामुळे तुमच्या बायकोच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होऊन ती तुमच्यावर कायम खुश असेल.
5. योग्य अपेक्षा ठेवा
तुम्ही तुमच्या बायकोकडून कधी कधी अवास्तव अपेक्षा करता कि जे वास्तविक जीवनात अशक्य असते. अशा प्रकारच्या अवास्तव अपेक्षा ठेवल्याने तुमचे वैवाहिक जीवन व तुमच्या पत्नीचा मूड बिघडू शकतो. त्यामुळे बायकोला नेहमी आनंदी व खुश ठेवण्यासाठी आपल्या अवास्तव अपेक्षांना योग्य वेळी लगाम घाला.
6. चांगले श्रोते व्हा
जेव्हा तुमची बायको तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा तिचे बोलणे मध्येच थांबवू नका, तुमच्या बायकोचे सर्व म्हणणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोच सर्व म्हणण लक्ष देऊन ऐकता तेव्हा तुमच्या बायकोला मनापासून खूपच बरे वाटते. त्यामुळे तुमची बायको तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही.
7. जबाबदारी घ्या
जेव्हा तुमची बायको तिचं सर्वस्व सोडून तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही हेच विसरून जाता कि तुमच्या आयुष्यात येण्याअगोदर तिचेही एक कुटुंब होते. तुम्ही तुमच्या अपेक्षांच्या भावविश्वात एवढे गुंग होऊन जाता कि तुमच्या जबाबदारीच भान तुम्हाला राहात नाही.
जर तुम्हाला तुमच्या बायकोला खुश ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या बायकोच्या आई-वडिलांची (तुमच्या सासू-सासऱ्यांची) योग्य जबाबदारी घ्या, जसे कि त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घ्या, कधी कधी आर्थिक अडचणीत त्यांच्या मदतीला धावून जा. असे केल्याने निश्चितच तुमची बायको तुमच्यावर खूपच खुश होईल आणि आपल्यालाही जबाबदारी पूर्ण केल्याचे समाधान मिळेल.
8. प्राधान्य द्या
दैनंदिन जीवनात कोणताही निर्णय घेण्याअगोदर तुम्ही तुमच्या बायकोचा योग्य तो सल्ला घ्या. काहीही निर्णय घेण्याच्या आधी तुमच्या बायकोच्या सल्ल्याला प्राधान्य द्या. यामुळे तुमच्या बायकोच्या मनात तुमच्याबद्दल विश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण होईल. त्यामुळे नक्कीच तुमची बायको तुमच्यावर खुश होईल.
9. बायकोला थँक्स म्हणण्यास विसरू नका
तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही फक्त तुमचा वैयक्तिक विचार करून जमणार नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा म्हणजेच तुमच्या पत्नीचा विचार करावा लागेल. तुमच्या पत्नीने जर तुमच्यासाठी एखादे काम केले तर त्याबद्दल तिला थँक्स म्हणण्यास विसरू नका.
तुमची पत्नी दिवसभरात तुमच्यासाठी स्वयंपाक करणे, बाजारातून सामान घेऊन येणे, मुलांची व सासू-सासऱ्यांची देखभाल करणे, घराची स्वच्छता करण्याबरोबरच इतरही अनेक कामे करत असते. अशावेळी जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुमच्या बायकोला थँक्स म्हणत कृतज्ञता व्यक्त केली तर ते तुमच्या बायकोला मनोमन आवडेल. तुमच्या या छोट्या कृतीमुळेही तुमची बायको तुमच्यावर खुश होईल.
तर मित्रांनो, या होत्या काही टिप्स ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बायकोला नेहमी खुश ठेवू शकता. खरतरं पत्नीला खुश ठेवण्याचा आणि आपलं वैवाहिक जीवन सुखाचं, समाधानाचं आणि आनंदात जगण्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. आम्ही दिलेल्या या बहुमूल्य टिप्सच्या मदतीने आपण आपल्या बायकोला खुश पण ठेवू शकता आणि आपले वैवाहिक जीवनदेखील आनंदात व्यतीत करू शकता.
जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या विवाहित मित्र, नातेवाईकांना हा लेख जरूर शेअर करा. कारण या लेखाचा जर त्यांना उपयोग झाला तर त्यांच्याही वैवाहिक जीवनात आनंद व चैतन्य पसरेल.
आपल्या काही शंका असतील तर त्या कमेंट करून आम्हाला कळवा. अशाच दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.