Why Makar Sankranti is Celebrated in Marathi
आपला भारत देश हा विविध सणावारांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण साजरा केला जातो. प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे महत्व आणि वैशिष्ट्य असते. प्रत्येक सण-समारंभ लोक मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. प्रत्येक सणाला भारतीय परंपरेत एक अनमोल असे महत्व आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा असाच एक सण प्रत्येक व्यक्ती आनंदाने साजरा करत असतो. त्याचे नाव आहे, “मकर संक्रांति”.
आज आपण मकर संक्रातीविषयी सर्व माहिती अगदी सविस्तर पाहणार आहोत, त्यात मकर संक्रांति सण का साजरा केला जातो? मकर संक्रांति सणाचे महत्व, हा सण कसा साजरा केला जातो? याचबरोबर अशा अनेक दृष्टीकोनातून आपण मकर संक्रांति या सणाची माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरु करूया…
Makar Sankranti in Marathi | मकर संक्रांति मराठी
मकर संक्रांति हा सण इंग्रजी वर्षातील पहिलाच सण असतो. या सणाचा थेट संबंध आपल्या पृथ्वी व सूर्याशी आहे. कारण यादिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे आपण यादिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो. हा सण देशातच नव्हे तर विदेशातही साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी याचे नाव वेगवेगळे असले तरी प्रत्येक व्यक्तीची भावना एकच असते.
मकर संक्रातीच्या अगोदर दिवस लहान असतो तर रात्र हि मोठी असते, मात्र मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होतो तर रात्र लहान होते. यावेळी हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढण्यास सुरुवात होते. म्हणजेच या दिवसापासून उन्हाळा या ऋतूला सुरुवात होते.
मकर संक्रांत साजरी करण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्यातीलच काही कारणे खाली दिली आहेत…
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान प्राप्त होते. त्यामुळे ते उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांती या सणाची वाट पाहू लागले. सूर्य यादिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्यालाच सूर्याचे उत्तरायण असे म्हणतात. ज्यादिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु झाले, त्याच दिवशी भीष्म यांनी प्राणत्याग केला. कारण आपल्या भारतीय संस्कृतीत व परंपरेत दक्षिणायनापेक्षा उत्तरायणाचा काळ अधिकच शुभ मानला जातो.
मकर हि एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळेच या दिवसाला मकर संक्रांति असे म्हटले जाते.
आपल्या भारतीय संस्कृतीत उत्तरायणाला अधिक महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. अजून एका मान्यतेनुसार असे सांगितले जाते कि, सूर्यदेव हे आपला पुत्र शनिदेवांच्या घरी गेले होते, त्यामुळे हा दिवस सुख-समृद्धीचा दिवस मानला जातो.
मकर संक्रांतीचे महत्व
मकर संक्रांतीचे भौगोलिक, सामाजिक, आहारदृष्ट्या खूपच महत्वाचे स्थान आहे. वर आपण पाहिलेच कि मकर संक्रांतीचे भौगोलिकदृष्ट्या किती महत्व आहे. या सणाला तिळाचे देखील फार महत्वाचे स्थान आहे. याकाळात खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडलेली असते. त्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी व थंडीपासून आपले संरक्षण होण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. कारण तीळ हे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतात.
यादिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात, त्यांचे आशीर्वाद घेतात. त्यामुळे स्नेहसंबंध दृढ होण्यास मदतच होते.
मकर संक्रांति कशी साजरी करतात?
वर आपण जाणून घेतलेच कि मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो? तसेच त्याचे काय महत्व आहे… आता आपण जाणून घेऊ कि मकर संक्राती हा सण कसा साजरा केला जातो?
मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यादिवशी लोक आपल्या नातलगांना, आप्तस्वकीयांना, मित्रमंडळीना, तसेच लहान मुलांना तिळगुळ देतात. तसेच वयाने लहान मुले, आप्तस्वकीय, नातलग हे वयाने मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतात. यामुळे एकमेकांप्रति स्नेहसंबंध अधिकच दृढ होतात.
स्रिया यादिवशी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. यामध्ये स्रिया एकमेकींच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन तीळ घेतात. त्या एकमेकींना हळदी-कुंकू लावतात. तसेच स्रिया यादिवशी घरी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला काहीतरी वस्तू भेट म्हणून देतात. याला “वाण देणे” असे म्हणतात.
लहान मुले यादिवशी खूपच खुश असतात. कारण यादिवशी लहान मुलांना बोरांची अंघोळ घातली जाते. यालाच “बोरन्हाण” असे म्हणतात. यामध्ये बोरे, चॉकलेट, उसाचे तुकडे, चुरमुरे, गोळ्या, बिस्किटे यांचे एकत्रित मिश्रण करून लहान मुलांच्या डोक्यावरून ते ओततात. अशावेळी इतर मुले ती बोरे, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट घेण्यासाठी चढाओढ करतात. अशावेळी सर्व मुलांना खूपच आनंद होतो.
मकर संक्रांतीला काही प्रांतात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याचा महोत्सव पार पडतो. यादिवशी लहान मुलांपासून ते मोठ्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. नाशिकच्या काही भागात पतंग महोत्सव खूपच मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात.
भारतीय परंपरेतील कोणताही सण आपल्याला आनंद, उत्साह, नवचैतन्य प्रदान करत असतो. प्रत्येक सणाचे आपले स्वतःचे एक वैशिष्ट्य असते. त्यातीलच एक असलेला मकर संक्रांती या सणाबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिली. आम्हाला आशा आहे कि, आम्ही दिलेल्या माहितीने आपले संपूर्ण समाधान झाले असेल. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.
आपल्या या लेखाबद्दल काही शंका असतील तर त्या आपण खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही त्याचे लवकरात लवकर निराकरण करू. अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.