हिंदू धर्म आणि संस्कृतीत साडे तीन मुहुर्तास खूपच महत्वाचे स्थान आहे. आपणही कधी ना कधी कोणाच्या तोंडून तरी साडेतीन मुहूर्ताच्या संदर्भात ऐकलेच असेल. हिंदू संस्कृतीत या “साडेतीन मुहुर्तास” खूपच महत्व प्राप्त झालेले आहे. या दिवशी लोक कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करतात, सोने-चांदी यांची खरेदी करतात.
आपल्या महत्वाच्या कामाची सुरुवात याच साडेतीन मुहूर्ताच्या दिवशी व्हावी हा प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न असतो. हे मुहूर्त पूर्णपणे शुद्ध असतात अशी लोकांची धारणा असते. अशी मान्यता आहे कि, साडेतीन मुहूर्ताच्या दिवशी प्रारंभ झालेल्या कार्याला हमखासपणे यश मिळतेच मिळते.
मुहूर्त म्हणजे काय?
बहुतेक लोकांना मुहूर्त म्हणजे काय? हे नक्कीच माहिती असेल किंवा आपण कुठेतरी नक्कीच मुहूर्त या शब्दाबद्दल वाचले किंवा ऐकले असेल.
मुहूर्त म्हणजे एक अशी शुद्ध, उत्तम वेळ कि ज्यावेळी कोणतेही शुभ कार्य सुरु करण्याबद्दल लोकांचा जास्तच ओढा असतो. इतर वेळी कोणतेही कार्य हाती घेताना लोक मुहूर्त पाहण्याला जास्त प्राधान्य देतात. परंतु हिंदू धर्म शास्रात अशा काही निवडक तिथींचा समावेश केला आहे, कि ज्यादिवशी कोणत्याही कार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. या मुहूर्ताला ‘स्वयं सिद्ध मुहूर्त’ असे म्हणतात. असे हे ‘स्वयं सिध्द मुहूर्त’ हिंदू धर्म शास्रात साडे तीन असल्याचे सांगितले जाते. त्यात
- गुढीपाडवा
- अक्षयतृतीया
- विजयादशमी (दसरा)
- बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
या मुहूर्तांचा समावेश होतो.
हिंदू धर्मशास्रात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या या साडे तीन मुहूर्ताबद्दल अधिक माहिती बघूया…
साडे तीन मुहूर्त | Sade Tin Muhurta
1. गुढीपाडवा
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभी दिवस म्हणून मानला जातो. हा सण साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. विशेषकरून गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जात असल्याने यादिवशी लोक नवीन वस्तूंची खरेदी, आपल्या नवीन व्यवसायाचा प्रारंभ, सोने-चांदी यांची खरेदी करण्याला प्राधान्य देतात. यादिवशी लोक मीठ, हिंग, मिरी, साखर कडूनिंबाच्या पानाबरोवर वाटून जो पदार्थ बनतो त्याचे सेवन करतात. यादिवशी लोक एक स्वच्छ काठी घेऊन त्याला रेशमी साडी किंवा रेशमी वस्र नेसवून त्यावर चांदीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा कलश चढवून त्याला कडुनिंबाची पाने, आंब्याची पाने, हार-तुरे, साखरेची माळ (गाठी – बहुतेक ठिकाणी याला गाठी असे म्हणतात) लावून सजवतात. हि तयार झालेली गुढी आपल्या घराच्या अंगणात किंवा खिडकीत उभारतात व नैवेद्य दाखवून तिची मनोभावे पूजा करतात.
लोक यादिवशी आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आप्तस्वकीयांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन व्यक्त करतात. अशाप्रकारे साडे तीन मुहुर्तांमध्ये गुढीपाडवा या सणाला खूपच विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.
2. अक्षय तृतीया
अक्षय तृतीया हा देखील साडेतीन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा कधीच क्षय (नाश) होत नाही असा. अक्षय तृतीया म्हणजे ज्या शुभ तिथीचा कधीच क्षय (नाश) होत नाही अशी तिथी. या दिवशी ज्या कार्याला प्रारंभ केला जातो, त्या कार्यात प्रचंड यश मिळते, अशी बहुतेक लोकांची धारणा आहे. अक्षय तृतीया म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी जे काम कराल, ते अक्षय होते (म्हणजे कधीही नष्ट होत नाही) अशी लोकांची धारणा असल्याकारणाने लोक यादिवशी दानधर्म, जपतप, होमहवन आदी गोष्टी करण्यास प्राधान्य देतात.
जर अक्षय तृतीया हि बुधवारी आली असेल आणि त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर अशावेळी अक्षय तृतीयेला खूपच पुण्यकारक समजले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सोने खरेदी करण्यास सर्वाधिक पसंती देतात.
3. विजयादशमी (दसरा)
विजयादशमी या सणालाच दसरा असेही संबोधले जाते. अश्विन महिन्यातील दशमीच्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध याच दिवशी केला होता, अशी मान्यता आहे. प्रभू रामचंद्रांचा वनवास याचदिवशी संपला व त्यामुळे समस्त लोकांनी आनंद साजरा केला. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी (दसरा) या सणाला महत्वाचे स्थान आहे.
दसरा या सणाच्या दिवशीच अष्टभुजा माता दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता. महिषासुराचा वध करून तिने महिषासुरमर्दिनी हे नाव धारण केले. त्यामुळे दसरा हा सण देखील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. लोक यादिवशी देखील कोणतेही काम सुरु करण्याला प्राधान्य देतात. शक्यतो नवीन घराचा शुभारंभ, नवीन वाहन खरेदी अशा कार्याला यादिवशी प्राधान्य दिले जाते.
4. बलिप्रतिपदा (पाडवा)
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून मानला जातो. यालाच दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते. हा दिवाळीचा चौथा दिवस असतो. हा दिवस नवीन कार्याच्या शुभारंभासाठी, नवीन खरेदी करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो.
समस्त व्यापारी वर्गाच्या दृष्टीने हा दिवस तर खूपच मोलाचा आहे. कारण यादिवशी व्यापारी लोक त्यांच्या वही खात्याचे मनोभावे पूजन करतात.
यादिवशी सोने खरेदीला सुद्धा हमखास प्राधान्य दिले जाते. यादिवशी लोक नवीन कार्य सुरु करण्यास आणि विविध वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
साडेतीन मुहूर्त | Sade Tin Muhurta
हिंदू संस्कृतीत साडेतीन मुहूर्त अतिशय पवित्र मानले जातात. या लेखात आपण साडेतीन मुहूर्त कोणते आहेत? ते खास का आहेत? याची माहिती जाणून घेतली. साडेतीन मुहुर्तात गुढीपाडवा, अक्षयतृतीया, विजयादशमी (दसरा) हे सण संपूर्ण एक मुहूर्त म्हणून गणले जातात तर बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) हा अर्धा मुहूर्त म्हणून गणला जातो. अशाप्रकारे हे साडेतीन मुहूर्त म्हणून ओळखले जातात.
हि माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील साडेतीन मुहूर्त म्हणजे नेमके काय? हे समजण्यास मदत होईल.
अशाच प्रकारच्या नवनवीन व दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.