Gautam Buddha Story in Marathi
महात्मा भगवान गौतम बुद्ध यांना शांती व अहिंसेचे प्रतिक मानले जाते. ज्यावेळी संपूर्ण पृथ्वीतलावर हिंसा, अंधविश्वास, अधर्म यांचे प्रस्थ माजले होते, त्यावेळी भगवान बुद्धांनी अवतरीत होऊन जगाला शांती व अहिंसेची शिकवण दिली. त्यांचे महान विचार आजही आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणा देतात.
आज या लेखात आपण भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातील असाच एक प्रसंग जाणून घेणार आहोत, कि जे वाचून आपल्याला नक्कीच कठीण प्रसंगाशी, अडी-अडचणीशी कसा लढा द्यायचा याविषयीचा मार्ग सापडेल.
चला तर मग सुरु करूया…
![]() |
Gautam Buddha Story in Marathi |
Gautam Buddha Life Story in Marathi
हि गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा भगवान गौतम बुद्ध विश्वभ्रमण करत होते आणि शांती व अहिंसेची शिकवण लोकांना देत होते.
एकदा महात्मा भगवान गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसमवेत एका गावात भ्रमण करत होते. त्यावेळी कोणतेही वाहन नसल्याने ते आणि त्यांचे शिष्य पायीच यात्रा करत असत. असचं भ्रमण करता करता त्यांना खूपच उशीर झाला.
भगवान गौतम बुद्ध एका झाडाखाली बसले. त्यांना खूपच तहान लागली होती. त्यांनी आपल्या एका शिष्याला पाणी आणण्याची आज्ञा दिली. त्याबरोबर तो शिष्य पाणी आणण्यासाठी शेजारीच असलेल्या नदीवर गेला. परंतु तिथे गेल्यावर त्याला वेगळेच दृश्य दिसले. त्याने पाहिले कि, गावातील काही लोक त्या पाण्यात आपली जनावरे धूत आहेत, काही लोक आपले कपडे धूत आहेत, लहान मुले त्या पाण्यात खेळत आहेत, त्यामुळे ते पाणी खराब आणि गढूळ झाले होते.
त्यामुळे त्या शिष्याला वाटले कि, आपल्या गुरुसाठी असे घाण आणि खराब पाणी घेऊन जाणे उचित नाही. त्यामुळे हा विचार करून तो तसाच पाणी न घेता परत आला. भगवान गौतम बुद्धांनी त्याला विचारले कि, तू पाणी का नाही आणलेस…?
त्यावर त्याने सांगितले कि, तिथे नदीत काही जण कपडे धूत होते, काही मुले त्यामध्ये आंघोळ करत होती, काही लोक त्या पाण्यात त्यांची जनावरे धूत होती, त्यामुळे पाणी खूपच खराब आणि गढूळ झाले होते. तुम्हाला असले खराब पाणी कसं द्याव…? असा विचार करून मी पाणी न घेताच परत आलो.
त्या शिष्याचे बोलणे ऐकल्यावर भगवान गौतम बुद्धांनी आपल्या एका दुसऱ्या शिष्याला पाणी आणण्यासाठी पाठवले. गुरूची आज्ञा मानून तो शिष्य पाणी आणण्यासाठी नदीच्या दिशेने वाटचाल करू लागला.
थोड्या उशिरानेच तो एका भांड्यात पाणी घेऊन आला.
भगवान गौतम बुद्धांनी त्याला विचारले कि, पाणी तर खराब होते, तरीदेखील तू स्वच्छ पाणी कसा घेऊन आलास…?
त्यावर तो शिष्य म्हणाला कि, प्रभू हि गोष्ट खरी आहे कि, त्या नदीतील पाणी खराब होते, परंतु मी तेथे तोपर्यंत थांबलो, जोपर्यंत ती लहान मुले, त्या स्रिया, ते लोक त्या नदीतून बाहेर येत नाहीत. ज्यावेळी ते बाहेर आले, त्यावेळी थोड्या वेळाने आपोआपच त्या नदीच्या पाण्यातील माती हळूहळू खाली जाऊ लागली आणि स्वच्छ पाणी दिसू लागले. ज्यावेळी ते पाणी एकदम स्वच्छ झाले, त्यावेळी मी ते आपल्यासाठी घेऊन आलो.
भगवान गौतम बुद्ध त्या शिष्याचे हे उत्तर ऐकून एकदम प्रसन्न झाले. त्यांनी सर्व शिष्यांना एक शिकवण दिली कि, आपले जीवनदेखील असचं पाण्यासारखे आहे. ज्यावेळी आपले कर्म चांगले आहे, त्यावेळी आपले जीवनदेखील त्या स्वच्छ पाण्याप्रमाणे असते. परंतु कधी कधी आपल्या जीवनात देखील काही अडचणी, पिडा, समस्या येतात आणि त्या आपले जीवन खराब आणि गढूळ करून टाकतात, ज्याप्रमाणे ते स्वच्छ पाणी खराब आणि गढूळ होते.
काही लोक जीवनात समस्या आल्यावर लगेच घाबरून जातात आणि आपल्या ध्येयापासून परावृत्त होतात. असे लोक त्यांच्या जीवनात कधीही यशस्वी होत नाही. तर दुसरीकडे काही लोक त्यांच्या जीवनात कितीही संकटे आली, समस्या आल्या तरी धैर्य ठेवतात, संयम ठेवतात आणि शांत राहून त्याचा सामना करतात. असे लोक त्या समस्येवर नक्कीच मात करतात आणि जीवनात पुढे जात राहतात. त्यांना त्यांच्या संयमाचे फळ नक्कीच मिळते.
तर मित्रांनो आपल्याला भगवान गौतम बुद्धांची हि कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. जरी आपल्या जीवनात काही समस्या, काही अडचणी आल्या तरी आपण न डगमगता त्याचा धैर्याने मुकाबला करा. ते दुःख, संकट काही वेळाने निघून जाईल, जसं ते गढूळ पाणी थोड्या वेळात स्वच्छ होते. त्यामुळे संयम ठेवा. भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे संयमाचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल.
आपल्याला जर हि कथा आवडली असेल तर अशाच स्वरूपाच्या कथा अजून मोफतपणे मिळविण्यासाठी आम्हाला टेलिग्रामवर जॉईन व्हा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अशाच प्रकारच्या प्रेरणा देणाऱ्या कथा (Motivational Stories in Marathi) वाचण्यासाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.