फक्त सुंदर दिसून काही उपयोग नाही, विचारदेखील सुंदर हवे…

Share :

Sundar Vichar – या लेखात एका महिलेचे उदाहरण देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कि, फक्त बाह्य सौंदर्य किंवा बाह्य श्रीमंती काही कामाची नाही, मनाची श्रीमंती खूप मोठी असते.

सध्याच्या काळात मनाच्या सौंदर्यापेक्षा बाह्य सौंदर्याला जास्तच महत्व दिले जाते, हे आपण कुठे ना कुठे नक्कीच अनुभवले असेल. आपण हे नेहमीच विसरतो कि, सौंदर्याची श्रीमंती, पैशाची श्रीमंती हि क्षणभंगुर असते. सौंदर्य, पैसा, मालमता या सर्व क्षणभंगुर बाबी आहेत. म्हणजेच त्या तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकतो. परंतु मनाची श्रीमंती हि तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे सर्व माहिती असूनही आजच्या काळात मनुष्य पैशाचा, दिसण्याचा खूपच मोह, दिखावा करताना आपल्याला दिसून येतो.

आपल्या पूर्वजांनी देखील आपल्याला हे सांगितले आहे कि, पैसा, सौंदर्य यापेक्षा मनाची श्रीमंती वाढवा. परंतु आपल्याला कोणी चांगले सांगितले आणि आपण ते ऐकले असे कधी होईल का…? आपण आपल्या पूर्वजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून पैसा, शारीरिक सौंदर्य वाढवण्याकडे जास्तच लक्ष देत असतो.

आता तुम्ही म्हणाल कि, पैसा, शारीरिक सौंदर्य महत्वाचे नाही का? तर हो, दैनंदिन जीवन जगण्याकरिता पैसा, शारीरिक सौंदर्य महत्वाचे आहे, परंतु आपण त्याला वाजवीपेक्षा जास्तच महत्व देताना दिसतो. मग त्यापुढे आपल्याला ना कशाचे भान राहते, ना स्वतःची कोणती जबाबदारी लक्षात येते…

Sundar-Vichar
Sundar Vichar

सध्या मनाच्या श्रीमंती, सौंदर्याला कमी लेखणारे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणारे समाजात भरपूर लोक असले तरी काही लोक आजही मनाच्या श्रीमंतीला, सुंदर विचारांना योग्य सन्मान देत असल्याचे आपण पाहिले असेल.

यासंदर्भात एक प्रसंग याठिकाणी आवर्जून सांगावा वाटतोय. हा प्रसंग काल्पनिक आहे कि सत्य घटनेवर आधारित आहे, हे आम्हाला ठाऊक नसले तरी हि घटना, प्रसंग खूप काही शिकवून जाते.

एकदा एका विमानात एक अतिशय सुंदर महिला प्रवेश करते. ती तिच्या बसण्याची जागा शोधण्याचा प्रयत्न करत असते. ती आपले सीट शोधण्यासाठी विमानात चोहीकडे नजर टाकते. तिला तिची बसण्याची जागा दिसते. खुश होऊन ती त्या जागेकडे जाते. परंतु जवळ गेल्यावर ती पाहते तर काय? तिच्या सीटच्या अगदी शेजारीच एक पुरुष बसलेला असतो कि ज्याचे दोन्ही हात नसतात.

आता ती थोडीशी नाराज होते आणि तोंड वेडेवाकडे करून इकडे तिकडे एअरहोस्टेस दिसते का हे पाहते. तिला थोड्याश्या अंतरावर एक एअरहोस्टेस दिसते. ती त्या एअरहोस्टेसजवळ जाते आणि तिला सांगते कि, मला माझी सीट बदलून हवी आहे. ती एअरहोस्टेस अतिशय अदबीने त्या सुंदर दिसणाऱ्या महिलेला विचारते, काय झालं मॅडम…? काही समस्या आहे का?

ती महिला सांगते कि, मला सीट बदलून हवी आहे…? 

एअरहोस्टेस त्या महिलेला विचारते कि, त्या सीटमध्ये काही दोष आहे का?

ती महिला उत्तर देते – नाही, तसं काही नाहीये…! परंतु माझ्या सीटच्या शेजारच्या सीटवर जी व्यक्ती बसलेली आहे, त्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत. त्यामुळे मला त्या व्यक्तीच्या शेजारी बसण्यास थोडसं विचित्र वाटत आहे.

ती एअरहोस्टेस त्या महिलेच हे उत्तर ऐकून एकदम अचंबित होते. कारण ती महिला अतिशय सुशिक्षित, सभ्य दिसत असते.

परंतु एअरहोस्टेस अतिशय अदबीने त्या महिलेला सांगते कि, याठिकाणी तर एकही सीट मोकळी नाहीये. परंतु आपण थोडावेळ थांबा मॅडम, मी आमच्या कॅप्टनला विचारून येते… एवढे बोलून ती एअरहोस्टेस कॅप्टनकडे जाते. तिथे ती एअरहोस्टेस कॅप्टनला सर्व घडलेला प्रसंग सांगते.

थोड्या वेळाने ती एअरहोस्टेस त्या महिलेजवळ येते आणि सांगते कि, “मी घडलेला प्रसंग विमानाच्या कॅप्टनला सांगितला आहे. त्यांनी त्यावर एक उपाय सुचवला आहे. मॅडम, याठिकाणी एकदेखील सीट मोकळी नाही, परंतु प्रथम श्रेणीत एक सीट मोकळी आहे.

आजपर्यतच्या इतिहासात असा निर्णय आम्ही प्रथमच घेत आहोत कि एखाद्या प्रवाशाला त्याच्या सीटच्या बदल्यात थेट प्रथम श्रेणीची सीट देण्याचा. आता त्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू उमटते व ती तिची बॅग घेण्यासाठी निघणार, तेवढ्यात ती एअरहोस्टेस त्या हात नसलेल्या मनुष्याकडे जाते, आणि त्या मनुष्याला अतिशय अदबीने विचारते, सर आपण प्रथम श्रेणीतून प्रवास करू इच्छिता का…?

ती एअरहोस्टेस त्या मनुष्याला असा प्रस्ताव देताच उपस्थित लोक मोठमोठ्याने टाळ्या वाजवून विमान प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतात. आता त्या महिलेला स्वतःचीच लाज वाटू लागते. ती शरमेन मान खाली घालते.

ती एअरहोस्टेस त्या मनुष्याला सांगते, सर कृपया आमची तुम्हाला विनंती आहे कि, आपण प्रथम श्रेणीतून प्रवास करावा. कारण आम्हाला नाही वाटत कि तुम्ही त्या घमंडी, बेशरम, स्वार्थी महिलेबरोबर प्रवास करावा व तिच्या वागण्याचा तुम्हाला त्रास व्हावा… त्यामुळे कृपया आपण प्रथम श्रेणीत चला.

हे ऐकल्यावर तो मनुष्य सांगू लागतो, कि मी एक माजी सैनिक आहे. जम्मू काश्मीरमध्ये एका ठिकाणी दहशतवाद्यांनी एक बॉम्ब ठेवला असल्याची खबर आम्हाला मिळाली, म्हणून तो बॉम्ब निकामी करण्यासाठी आम्ही तिथे गेलो. परंतु तो बॉम्ब निकामी करत असतानाच त्याचा स्फोट झाला आणि मला माझे दोन्ही हात कायमचे गमवावे लागले. मी त्या स्फोटातून कसबसा वाचलो.

मी तुमचे आणि त्या महिलेचे बोलणे ऐकत होतो, ज्यावेळी मला असं कळल कि, त्या महिलेला माझ्या शेजारी बसण्याची लाज वाटत आहे, त्यावेळी मी असा विचार केला कि, मी कोणत्या लोकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि स्वतःचे हात कायमचे गमावले. परंतु आता तुमच्या विचारांना बघून मला एक गोष्ट नक्की समजली कि, देशात जसे त्या बाईसारखे घमंडी, मतलबी लोक आहेत, तसेच तुमच्यासारखे, तुमच्या कॅप्टनसारखे मनाने श्रींमंत असणारे लोकदेखील आहेत, त्यामुळे आता मला अभिमान वाटत आहे कि, तुमच्यासारख्या लोकांसाठी मी माझा स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाची सेवा करत होतो.

आता तर त्या महिलेला स्वतःची इतकी लाज वाटत होती, कि ती शरमेन वर देखील बघू शकत नव्हती. त्या एअरहोस्टेसने त्या सैनिकाची बॅग घेतली आणि ते विमानातील प्रथम श्रेणीमध्ये निघून गेले. संपूर्ण प्रवासात त्या महिलेने स्वतःचे डोके वर काढले नाही. कारण तिला तिच्या या विचारांची लाज वाटत होती.

मित्रांनो समाजात त्या महिलेसारखी खूप माणस राहतात कि जी स्वतःच्या सौंदर्याला, पैशाच्या श्रीमंतीला सर्व काही समजतात. त्यांना त्यांच्या सौंदर्यापुढे, पैशाच्या श्रीमंतीपुढे दुसरे लोक व त्यांचा त्याग याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्यांना फक्त आणि फक्त त्यांचा स्वार्थ महत्वाचा असतो. परंतु पैशाच्या श्रीमंतीपेक्षा आणि शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाची श्रीमंती केव्हाही चांगली…

त्यामुळे मित्रांनो पैशाच्या आणि शारीरिक सौंदर्याच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती कमावणे कधीही चांगले, हो कि नाही…!

मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि,हा लेख आपल्याला नक्कीच आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

अशाच प्रकारचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम वर Follow करा आणि वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.


Share :

Leave a Comment