हत्ती आणि साखळीची कथा | Elephant Story in Marathi

Elephant Story in Marathi - आजच्या या लेखात आपण अशी एक कथा अभ्यासणार आहोत कि, ज्यातून आपल्याला नक्कीच खूप सारी प्रेरणा मिळेल. अवश्य वाचा...

Elephant Story in Marathi

एकदा एक व्यक्ती रस्त्याने चालत असतो. तेव्हा त्याचे लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या हत्तीकडे जाते. ज्यावेळेस तो व्यक्ती लक्षपूर्वक पाहतो, त्यावेळी तो व्यक्ती आश्चर्यचकित होतो. तो बघतो की, एका महाकाय हत्तीला एका छोट्याश्या साखळीने बांधून ठेवले आहे. त्या व्यक्तीला हे माहीत होते कि जर हत्तीच्या मनात आले तर एका क्षणात तो ती साखळी कुठच्या कुठं फेकून देईन. पण तो हत्ती असं काहीही करत नव्हता. तो तर अगदी आरामात शांतपणे उभा होता.

न राहवून तो व्यक्ती त्या हत्तीच्या मालकाला विचारतो की, "तुम्ही या हत्तीला फक्त एका लहान साखळीने बांधले आहे, जर त्या हत्तीच्या मनात आले, तर तो या साखळीच्या दुप्पट तिप्पट असणाऱ्या साखळदंडाला देखील कुठच्या कुठं फेकून देईल! परंतु हा हत्ती असं काहीही न करता अगदी शांतपणे उभा आहे, असं का?"

त्यावेळी तो हत्तीचा मालक सांगतो, "ज्यावेळी हा हत्ती अगदी लहान होता, त्यावेळी मी त्याला याच साखळीने बांधत होतो. त्यावेळी त्याने ही साखळी तोडण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो लहान असल्यामुळे साखळी तोडण्याचे सामर्थ्य त्याच्यात नव्हते. त्याने असा प्रयत्न पुष्कळ वेळेस केला परंतु त्यामध्ये त्याला यश आले नाही."

Elephant-Story-in-Marathi
Elephant Story in Marathi

पुढे त्या लहान असणाऱ्या हत्तीने असा समज करून घेतला की, ही साखळी इतकी मजबूत आहे कि ती आपण तोडू शकत नाही. त्याच्या लहानपणीचा हा विचार आजही त्याच्या मनात घर करून बसलेला आहे की, ही साखळी आपण तोडू शकत नाही. म्हणून तो साधा प्रयत्न देखील करत नाही. त्यामुळे महाकाय साखळदंडाने बांधण्याऐवजी मी आजही त्याला एका छोट्याशा साखळीनेच बांधतो.

हे देखील वाचा - फक्त सुंदर दिसून काही उपयोग नाही, विचारदेखील सुंदर हवे...

मित्रांनो जसे त्या हत्तीच्या मनात या गोष्टीने घर केले होते की, ती साखळी आपल्याला काही तुटू शकत नाही तसेच दैनंदिन जीवनात आपल्याही मनात काही नकारात्मक गोष्टी घर करून बसतात. मग त्यात मी परीक्षा कधीही पास होऊ शकत नाही, मला कधीही चांगली नोकरी मिळू शकणार नाही, मला व्यवसाय जमणार नाही अशा कितीतरी भ्रामक नकारात्मक समजुती आपण आपल्या मनात ठेवतो आणि त्यावर विश्वास ठेवू लागतो. या नकारात्मक विचारामुळे मग आपण कधी साधा प्रयत्न देखील करत नाही.

मित्रांनो ज्याप्रमाणे त्या हत्तीमध्ये ती लहानशी साखळी तोडून कुठच्या कुठं फेकून देण्याचं सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे आपल्याकडेही विविध बाबींचे सामर्थ्य असते. मात्र जोपर्यंत आपण आपल्यावरील नकारात्मक जोखड फेकून देत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीत यश मिळणार नाही. आपले नकारात्मक विचार हेच आपल्या यशामधील मोठा अडथळा आहे. त्यामुळे त्यांना तोडून फेकून देऊन सकारात्मक विचारांची कास हाती धरणे हीच यशाकडे जाणारी एक पायरी आहे.

हे देखील वाचा - Marathi Katha | मराठी कथा - कादंबरी

जर कोणतीही नकारात्मक विचारांची बंधने आपल्या प्रगतीच्या आड येत असतील तर अशी सर्व बंधने तोडून फेकून द्या आणि मोकळा श्वास घेऊन त्यावर मात करण्यासाठी सज्ज व्हा आणि यशस्वीतेची एक गरुडझेप घ्या.

अशाच प्रकारच्या प्रेरणादायक कथा वाचण्यासाठी वेळोवेळी येथे भेट द्या आणि ही कथा आपल्या मित्र मंडळीना अवश्य शेअर करा.