श्रीमंत माणूस आणि त्याच्या मुलाच्या वाईट सवयीची कथा | Rich Man Story in Marathi

Rich Man Story in Marathi - येथे आपण एक कथा जाणून घेणार आहोत, त्यामध्ये एक श्रीमंत माणूस आहे आणि त्याचा एक मुलगा आहे. त्या मुलाला काही वाईट सवयी असतात. त्याबद्दलच हि कथा आहे. निश्चित वाचा...

Rich Man Story in Marathi

एका गावात एक अतिशय श्रीमंत माणूस राहत असे. त्या गावात त्याला खूपच मानसन्मान मिळत असे. कारण त्याच्या इतका श्रीमंत माणूस त्या गावात नव्हताच. कोणत्याही कामात किंवा अडचणीत त्याचा सल्ला लोक नक्की घेत.

हा श्रीमंत माणूस जरी इतरांना मदत करत असला तरी त्याला एक चिंता ग्रासत होती. त्याला एक मुलगा होता. तो त्याचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे लहानपणापासूनच त्याचे नको तितके लाड झालेले होते. पुढे तो मोठा झाल्यावर काही वाईट सवयींच्या आहारी गेला. जुगार, नशा हे तर नित्याचेच झालेले होते. हा श्रीमंत माणूस त्याच्या मुलाच्या या वाईट सवयीमुळे नेहमी चिंताग्रस्त दिसत असे.

Rich-Man-Story-in-Marathi
Rich Man Story in Marathi

तो श्रीमंत माणूस जेव्हा त्याच्या मुलाला समजावत असे कि, तू वाईट सवयी सोडून दे. त्यावेळी त्याचा मुलगा त्याला म्हणत असे कि, "मी अजून लहान आहे. हळू हळू मी मोठा झालो कि, त्या सवयी मी सोडून देईन." पण त्याच्या त्या वाईट सवयी काही कमी होत नव्हत्या. तो श्रीमंत माणूस आता हताश झाला होता.

एके दिवशी त्या गावात एक थोर महापुरुष आले. त्यांची महती विविध ठिकाणी पोहोचलेली होती. त्यामुळे त्या गावातील प्रत्येक जण त्या महापुरुषाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ लागला. जेव्हा त्या श्रीमंत माणसाला त्या महापुरुषाबद्दल समजले तेव्हा त्यानेदेखील विचार केला कि, आपणही त्या महापुरुषाकडे जाऊन आपली समस्या सांगू. बघूया काही फायदा होतो का? असे म्हणून तो श्रीमंत माणूस त्यांच्याकडे गेला आणि त्याने आपली सर्व समस्या त्यांना सांगितली.

त्या महापुरुषाने त्या श्रीमंत माणसाची समस्या शांतपणे ऐकून घेतली आणि स्मितहास्य करत ते त्या श्रीमंत माणसाला म्हणाले कि, "उद्या तू तुझ्या मुलाला येथे घेऊन ये."

तो श्रीमंत माणूस म्हटला कि, "ठीक आहे. मी माझ्या मुलाला उद्या येथे घेऊन येतो." असे म्हणून त्याने त्या महापुरुषाचे दर्शन घेतले आणि तो तेथून घरी निघून गेला.

दुसऱ्या दिवशी तो आपल्या मुलाला घेऊन त्या महापुरुषाकडे गेला. त्या महापुरुषाने मुलाला जवळ बोलावले आणि म्हटले कि, "चल आपण जरा फेरफटका मारून येऊ." असे म्हणून ते दोघेही फेरफटका मारण्यासाठी निघाले.

हे देखील वाचा...

वाटेत चालता चालता अचानक ते एका ठिकाणी थांबले आणि त्या मुलाला ते म्हणाले कि, "काय तू या छोट्या झाडाला उपटू शकतो काय?"

त्या मुलाने पाहिले तेव्हा त्याला हसू आले. तेथे अगदी लहान एक रोपटे होते. तो म्हणाला कि, "हो, नक्की...! त्यात काय मोठी गोष्ट आहे. असे म्हणून त्या मुलाने ते रोपटे अगदी सहज उपटून फेकून दिले. थोड्याश्या गर्विष्ठ चेहऱ्यानेच त्याने त्या महापुरुषांकडे पाहिले. त्यांनी एक स्मितहास्य केले आणि ते पुढे चालू लागले. त्यांच्या मागोमाग हा मुलगा देखील चालू लागला.

थोडे पुढे आल्यावर ते परत एका ठिकाणी थांबले आणि पहिल्या रोपट्यापेक्षा थोड्या मोठ्या झाडाकडे बघत ते त्या मुलाला म्हणाले कि, "तू हे झाड उपटू शकतोस काय?"

तो मुलगा त्या झाडाकडे बघत म्हणाला कि, "हो. नक्की...!

असे म्हणून तो त्या झाडाला उपटण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी त्याला थोडीशी जास्त मेहनत करावी लागली परंतु त्याने ते झाड उपटून टाकले.

आता ते परत पुढे चालू लागले. एका ठिकाणी थांबून त्या महापुरुषाने त्याला एक झाड उपटून टाकण्यास सांगितले. ते एक वडाचे झाड होते. त्या मुलाने त्या झाडाला हिसके देण्यास सुरुवात केली. त्याने खूप प्रयत्न केले परंतु त्याला ते झाड काही उपटत नव्हते. शेवटी तो त्या महापुरुषास म्हणाला कि, हे झाड खूपच मजबूत आहे. याच्या मुळ्या खोलवर रुतलेल्या आहेत. त्यामुळे हे झाड उपटणे अशक्य आहे.

ते महापुरुष त्याच्याकडे स्मितहास्य करत म्हणाले कि, "मुला आपल्या सवयीचे देखील असेच आहे. ज्यावेळी त्या कमी प्रमाणात असतात, सुरुवातीच्या काळात असतात, त्यावेळी त्या सोडणे अगदी सोपे असते. परंतु जस-जशा त्या जुन्या होत जातात, त्या आपल्या मनात, शरीरात रुतत जातात. मग त्या सवयी सोडणे अवघड होऊन बसते. त्यामुळे सुरुवातीच्या काळातच त्या सवयी उपटून फेकून देणे कधीही चांगले. तरच या वाईट सवयींपासून आपली सुटका होईल.

आता त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला कळून चुकले कि, साधू महाराजांनी आपल्याला हा एक मोलाचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यानेही त्याच्या वाईट सवयी लगेच सोडून दिल्या आणि एक चांगला व्यक्ती म्हणून तो समाजात वावरू लागला. हे सर्व पाहून त्या श्रीमंत माणसाला खूपच आनंद झाला. तो लगेच त्या साधूंकडे गेला आणि त्यांचे त्याने आभार मानले.

मित्रांनो या कथेतून एक शिकवण आपल्याला मिळते ती म्हणजे, आपल्या वाईट सवयी या प्रत्येकाला माहिती असतात. सुरुवातीच्या काळातच जर आपण त्या सोडून देण्याचा किंवा त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यामध्ये नक्कीच यश मिळते. मात्र त्या सवयी जस-जशा जुन्या होत जातात, तेव्हा त्या आपल्यात भिनतात. मग मात्र त्या सवयी सोडणे, त्यांचा त्याग करणे अवघड होऊन बसते.

मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, हि उपदेशात्मक कथा आपल्याला नक्कीच आवडली असेल. अशाच दर्जेदार कथा वाचण्यासाठी येथे वेळोवेळी भेट द्या. हि कथा आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.