सिंह आणि उंदीर – सुंदर मराठी कथा | Sinha ani Undir Marathi Story

Share :

सिंह आणि उंदीर | Sinha ani Undir – येथे आपण सिंह आणि उंदीर यांची सुंदर मराठी कथा, गोष्ट वाचणार आहोत. हि गोष्ट वाचून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. नक्की वाचा…

Sinha ani Undir

एकदा एका जंगलात एक सिंह नुकताच शिकार करून आरामात आपल्या गुहेच्या बाहेर सुस्तपणे निजला होता. त्यावेळी एक उंदीर अन्नाच्या शोधात तेथे आला. उंदराने पाहिले की सिंहाने केलेल्या शिकारीतील थोडीशी तेथे शिल्लक होती, परंतु ती सिंहाच्या पलीकडे होती. आता उंदीर पेचात पडतो की पलीकडे जायचे कसे…? कारण जर आपण तेथे जाण्याचा प्रयत्न केला आणि जर का सिंह जागा झाला तर मग मात्र आपले काही खरे नाही.

Sinha-ani-Undir
Sinha ani Undir

उंदीर असा विचार करत असतो, परंतु हे ही खरे असते की त्याला एकदम जोराची भूक लागलेली असते.

तो हळूच सिंहाचा अंदाज घेतो. सिंह तर अगदी गाढ झोपेत असतो. आता उंदीर सिंहाच्या अंगावरून हळूच पलीकडे जाण्याचे ठरवतो. त्याप्रमाणे अगदी कोणताही आवाज न करता तो सिंहाच्या अंगावर चढतो. जरासा घाबरत घाबरतच अंगावर चढल्याने त्याचा अचानक तोल जातो आणि तो एकदमच सिंहाच्या तोंडाजवळ येऊन पडतो. तो खाली पाला- पाचोळ्यात पडल्यामुळे त्या पाला- पाचोळ्याचा आवाज होतो आणि त्या आवाजाने तो सिंह जागा होतो.

एकतर गाढ लागलेली झोप मोडल्याने तो अगोदरच चिडलेला असतो. समोर उंदराला पाहताच तो अजूनच चिडतो आणि लगेच गर्जना करत तो त्या छोट्याशा उंदराला पंजात पकडतो. सिंह म्हणतो, “काय रे पिटूकल्या उंदरा, माझी झोप मोडायची तुझी हिंमतच कशी झाली…? थांब आता तुझा फडशाच पाडतो.”

आता उंदीर तर खूपच घाबरलेला असतो. आता त्याला वाटते की आपले काही खरे नाही. तो सिंहाला हात जोडून विनंती करू लागतो, “महाराज माझी चूक झाली. परंतु असे करू नका. मला मारू नका. माझ्यासारख्या इवल्याशा प्राण्याला मारून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही मला माफ करा महाराज. मी तुम्हाला वचन देतो की मी नक्कीच तुमची मदत करील.

असे म्हटल्याबरोबर सिंह जोरजोरात हसू लागला. सिंह उंदराला म्हणाला, “अरे पिटूकल्या उंदरा, तुझा आकार बघ, माझा आकार बघ. तुझी शक्ती बघ आणि माझी शक्ती बघ. तू काय माझी मदत करणार…?

उंदीर विनवणी करत होता. सिंहाने नुकतेच पोट भरून शिकार खाल्लेली असल्याने आणि त्याला त्या इवल्याशा उंदराची दया आल्याने त्याने त्या उंदराला सोडून दिले. उंदीर सिंहाचे आभार मानत पटकन तिथून पळत सुटला.

पुढे काही दिवसांनी त्या जंगलात शिकारी आले. त्यांना एका धडधाकट सिंहाला पकडायचे होते. सिंह बाहेर गेलेला असताना त्यांनी त्या सिंहाच्या गुहेजवळ जाळे लावले. सिंह परत गुहेकडे येताच तो त्या जाळ्यात अडकतो. सिंह जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी खूपच धडपड करतो परंतु जाळे खूपच मजबूत असल्याने त्याच्या धडपडीचा काहीही उपयोग होत नाही. आता शेवटी सिंह रडकुंडीला येतो आणि मोठमोठ्याने गर्जना करू लागतो.

सिंहाचा असा आवाज ऐकून तो उंदीर तेथे येतो. तो पाहतो की सिंह या जाळ्यात अडकला आहे. तो उंदीर लगेच पुढे जातो आणि सिंहाला दिलासा देत म्हणतो की, “महाराज आपण काळजी करू नका. मी आपल्याला यातून बाहेर काढतो.”

सिंहाला वाटते की आपण इतके शक्तिवान असून देखील आपल्याला या जाळ्यातून बाहेर पडणे शक्य नाही आणि हा उंदीर काय आपल्याला यातून बाहेर काढणार…? हा आपली नक्कीच चेष्टा करत असणार.

सिंह पुन्हा मोठमोठ्या आवाजात गर्जना सुरू करतो. उंदीर सिंहाला विनंती करतो की, “महाराज कृपया आवाज करू नका, नाहीतर ते शिकारी परत येतील.” सिंह आता शांत होतो. उंदीर सिंहाला म्हणतो की, “महाराज मी हे जाळे कुरतडून टाकतो.” असे म्हणून तो एक एक करून जाळे कुरतडन्यास सुरुवात करतो.

इकडे शिकारी त्या सिंहाचा आवाज ऐकतात. त्यांना खात्री पटते की सिंह त्यांच्या जाळ्यात अडकला आहे. ते लगेच दोरी, हत्यारे घेऊन त्या सिंहाच्या गुहेच्या दिशेने निघतात. उंदीर लांबूनच त्या शिकाऱ्यांना बघतो आणि आता पटापट तो जाळे कुरतडन्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या दाताला इजा होते, त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागते. इतके होऊनही उंदीर काही थांबत नाही. तो पटापट ते जाळे कुरडतवणे चालूच ठेवतो.

आता जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त जाळे कुरतडणे झाल्यावर सिंह एक जोराचा झटका मारतो. सिंहाने जोराचा झटका मारताच ते जाळे तुटते आणि सिंह त्या जाळ्यातून बाहेर येतो. ते शिकारी लांबूनच त्या सिंहाला जाळ्यातून बाहेर आलेले पाहतात आणि लगेच पळून जातात.

आता सिंहाकडे शब्दच उरत नाही. तो त्या इवल्याशा उंदराची ही किमया बघून हैराण होतो. सिंह त्या उंदराचे आभार मानतो आणि त्या उंदराला म्हणतो की, “जर आज तू नसतास तर माझे काही खरे नव्हते… मी तुला त्यादिवशी हसलो होतो, परंतु मला माफ कर.”

मग उंदीर आणि सिंह त्या दिवसापासून अगदी जिवाभावाने त्या जंगलात राहू लागतात.

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि सिंह आणि उंदराची हि मराठी गोष्ट आपल्याला नक्की आवडली असेल. या कथेवरून हे तात्पर्य निघते कि, कोणी कितीही मोठे असेना किंवा कितीही शक्तिमान असेना, कधी कधी लहान माणसे त्यांना अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात. त्यामुळे कधीही कोणाही व्यक्तीला कमी समजू नये किंवा त्यांना त्यांच्या लहानपणामुळे हिणवू नये.

हि कथा आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. अशाच नवनवीन आणि मजेदार मराठी गोष्टी वाचण्यासाठी वेळोवेळी Net Marathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment