जसे कर्म तसेच त्याचे फळ | कुत्रा आणि गाढव मराठी कथा | Best Marathi Story

Share :

कुत्रा आणि गाढव मराठी कथा – येथे आपण कुत्रा आणि गाढव यांची सुंदर मराठी कथा, मराठी गोष्ट वाचणार आहोत. या मराठी कथेतून आपल्याला महत्वपूर्ण बोध मिळेल. नक्की वाचा…

जसे कर्म तसेच त्याचे फळ

एकदा एक व्यापारी आपल्या गाढवाच्या पाठीवर काही वस्तू घेऊन दूर शहरात विकण्यासाठी चालला होता. त्याचबरोबर त्या गाढवाच्या पाठीवर त्या व्यापाऱ्याने त्याची एक पिशवी देखील बांधलेली होती. त्या व्यापाऱ्याच्या बरोबर त्याचे एक कुत्रेदेखील होते. त्या व्यापाऱ्याला कधी कधी रात्री देखील प्रवास करावा लागत असे, त्यामुळे त्याने त्या कुत्र्याला आपल्या बरोबर घेतले होते.

खूप वेळ चालल्यावर आणि दुपारचे ऊन डोक्यावर आल्यामुळे त्या व्यापाऱ्याने एखाद्या झाडाखाली थांबण्याचे ठरवले. त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला एक झाड दिसले. त्याने त्या झाडाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. तो व्यापारी चालून चालून खूपच थकला होता, त्यामुळे तो जेवण न करता तसाच झोपी गेला. त्या मालकाची एक सवय होती, तो ज्यावेळी जेवण करायला बसत असे, त्यावेळी तो त्या कुत्र्याला देखील भाकर देत असे. परंतु आज तो तसाच झोपी गेल्याने त्या कुत्र्याला काही भाकर मिळाली नाही.

Kutra-aani-Gadhav-Marathi-Story
Dog and Donkey Marathi Story

काही वेळाने तो कुत्रा गाढवाकडे जातो, गाढव एका ठिकाणी काहीतरी खात असते. कुत्रा त्या गाढवाला अतिशय विनम्रतेने म्हणतो की, हे माझ्या मित्रा, मला खूपच भूक लागली आहे, मालकदेखील जेवण न करता तसेच झोपी गेल्यामुळे मला काही आज भाकर मिळाली नाही. कृपया तुझ्या पाठीवरील जे सामान आहे त्यातून मला एक दोन भाकऱ्या देतोस का?

ते गाढव त्याच्याकडे न बघताच उत्तर देते कि, अरे मी तुला भाकरी दिल्या असत्या रे, परंतु आपले मालक झोपी गेलेले आहे, ते उठले की मी त्यांना विचारीन आणि जर का आपले मालक हो म्हणाले तर मी तुला त्या पिशवीतील भाकर देईल.

गाढवाचे असे बोलणे ऐकून त्या कुत्र्याला भयंकर राग आला. कारण त्याला खूपच भूक लागली होती. आपला राग आवरत तो त्या गाढवाला म्हणाला कि, मित्रा या बाबतीत आपल्या मालकाला काय विचारायचे…? कारण तू मला त्यातील भाकर दिलीस तरी आपले मालक तुला काही म्हणणार नाहीत. आपले मालक खूप दमलेले असून ते आता झोपी गेलेले आहेत आणि मला वाटतंय कि ते आता उशिराच उठतील. मला तर भयंकर भूक लागली आहे. कृपा करून मला एक दोन भाकरी दे ना…!

हे वाचा : सिंह आणि उंदीर – सुंदर मराठी कथा | Sinha ani Undir Marathi Story

त्या कुत्र्याचे हे बोलणे ऐकून गाढव त्या कुत्र्याला म्हणतो की, “अरे असे नाही करता येणार. मालक उठले की मी त्यांना विचारतो आणि ते जर हो म्हटले तर तुला मी लगेच भाकरी देईल. तो पर्यंत मी तुला भाकरच काय त्यातील एक तुकडा देखील देणार नाही.”

ते असे बोलत असतानाच तेथे एक भलामोठा लांडगा येतो. तो लांडगा त्या गाढवावर हल्ला करतो आणि त्याच्या धारदार नखांनी आणि टोकदार दातांनी त्या गाढवाचा फडशा पाडण्यास सुरुवात करतो. गाढव जिवाच्या आकांताने त्या कुत्र्याला त्याचा जीव वाचवण्याची विनंती करतो.

कुत्रा त्या गाढवाचे बोलणे ऐकतो आणि तो त्या गाढवाला म्हणतो की, “मी तुझा जीव वाचवला असता रे, पण जर मला आपल्या मालकाने तसे सांगितले तरच मी तुझा जीव वाचवीन. मी देखील तुझ्यासारखाच मालकाच्या आज्ञेचे पालन करणारा आहे. त्यामुळे माझा नाईलाज आहे.

गाढव त्या कुत्र्याला म्हणतो की, मालक तर झोपलेले आहेत, ते कधी उठतील…? कृपया माझा जीव वाचव.

कुत्रा त्या गाढवाला म्हणतो की, “नाही ते शक्य नाही. मालक झोपेतून उठल्यावर आणि त्यांनी मला तुला वाचवायला सांगितल्यावरच मी तुझा जीव वाचविन.”

त्यांचे बोलणे संपेपर्यंत तो लांडगा त्या गाढवाच्या नरडीचा घोट घेतो. आता त्या गाढवाला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतो. तो मरता मरताच मनाशीच म्हणतो कि, जर मी या कुत्र्याला भाकर दिली असती तर आज त्या कुत्र्याने माझा जीव वाचवला असता. परंतु आता काय उपयोग… माझ्या कर्मानेच आज माझा बळी घेतला. जसे माझे कर्म होते तसेच मला त्याचे फळ मिळाले.

मित्रांनो या कथेवरून आपल्याला हेच शिकायला मिळते कि, आपल्या मालकाची किंवा आपल्या वडिलधाऱ्या व्यक्तींची आज्ञा पाळणे हे आपले कर्त्यव्य आहे. परंतु कधी कधी काळ, वेळ, प्रसंग पाहून देखील आपण काही निर्णय घ्यावयास हवे. जसे कि, जर त्या गाढवाने त्या कुत्र्याला भाकर दिली असती तर कुत्र्यानेदेखील त्याचे त्या लांडग्यापासून रक्षण केले असते. गाढवाच्या हेकेखोरपणामुळे त्या कुत्र्याला उपाशी राहावे लागले परंतु गाढवाचा मात्र जीव गेला.

हे वाचा : हत्ती आणि साखळीची कथा | Elephant Story in Marathi

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि कुत्रा आणि गाढव यांची हि मराठी गोष्ट आपल्याला नक्की आवडली असेल. जर आपल्याला हि मराठी कथा आवडली असेल तर आपण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तसेच हि कथा आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. अशाच नवनवीन आणि मजेदार मराठी गोष्टी वाचण्यासाठी वेळोवेळी Net Marathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment